नागपूर - नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत त्यांनी विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करत भाजपाच्या संदीप जोशींचा पराभव केला आहे. अभिजित वंजारी हे विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहे.
भाजपाच्या गडाला खिंडार -
गेल्या ५८ वर्षांपासून भाजपाने राखलेल्या गडाला खिंडार पडले आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपा उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव झाला आहे. या पराभवाच्या निमित्ताने आता अनेक कारणे पुढे येत आहेत. मात्र अति आत्मविश्वास भाजपाला नडल्याचा मतप्रवाह नागपूरसह विदर्भात वाहू लागला आहे. हा विजय जरी काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांचा असला तरी चर्चा मात्र संदीप जोशी यांच्या पराभवाची जास्त होत आहे.
सर्व अधिकारी केंद्रांवर उपस्थित -
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. निवडणूक निरीक्षक एस. वी. आर. श्रीनिवास, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्यासह विभागातील सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मतमोजणीशी संबंधित विविध अधिकारी केंद्रावर उपस्थित आहेत.
२८ टेबलवर मतमोजणी -
पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एकूण 1 लाख 32 हजार 923 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 64. 38 आहे. चार कक्षांतील 28 टेबलवर मतमोजणी झाली.
हेही वाचा -मराठवाडा पदवीधर निवडणूक; महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांची हॅट्रिक