नागपूर - राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे जणू काल्पनिक मालिका असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काही दिवसानंतर राहुल गांधी यांचे भाषण सुरू होण्याआधी टीव्हीवर लिहिले जाईल की, यातील सर्व मुद्दे हे काल्पनिक आहेत, याचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही. यावर विश्वास ठेवला तरी यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहाल, हे भाषण केवळ मनोरंजनासाठी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपुरात आयोजित सभेत बोलत होते.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री यांची जाहीर सभा झिंगाबाई टाकळी या परिसरात आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. यामध्ये नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे सर्व पक्षांच्या बैठकी, जाहीर सभा शहरात होत आहेत. त्यातलाच प्रचाराचा शेवटचा रविवार होता. यामुळे नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्षाच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.