गोंदिया- गोरेगाव वनविभागाअंतर्गत आढळून आलेल्या दोन बिबट्या आणि एक नीलगाय शिकार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागपूर येथील मुख्य वन संरक्षण आणि त्यांची टीम दाखल झाली आहे. ही शिकार अंधश्रद्धेपोटी करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंधश्रद्धेपोटी शिकार
तिल्ली-मोहगाव इंदिरा नगर शेतातील विहिरीत ३ जानेवारीला एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. त्या घटनास्थळावरुन थोड्यात अंतरावर एक निलगायही मृत अवस्थेत आढळून आली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आणि एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. या दोन्ही बिबट्यांची शिकार करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण दोन्ही मृत बिबट्यांचे पंजे आणि शीर गायब होते. त्यामुळे ही शिकार अंधश्रद्धेपोटी करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वनविभाच्या कार्यक्षमतेवर शंका
ही घटना जंगल मार्गातून केवळ ८० फूट अंतरावर घडली. या मार्गावर वनविभाच्या कर्मच्यांद्वारे गस्त घालण्यात येते. तरीही कर्मचाऱ्यांचे या घटनेकडे लक्ष गेलं नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर घटनेची माहिती मिळूनही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत वाच्यता केली नसल्याची चर्चा सुरु आहे. या आगोदरही अनेकदा जंगली प्राण्यांच्या शिकार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाचा चोख बंद असूनही शिकारी सारख्या घटना घडत असल्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
श्वास पथकाची घेतली जाणार मदत
बिबट्याच्या शिकार प्रकरणात वनविभाग वेगवेगळ्या दिशेने तपास करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागपुर येथुन मुख्य वन संरक्षक पी. कल्याण, उपवन संरक्षक एस. कुलराज, सहायक उपवन संरक्षक एस. सदगीर तसेच त्यांचे पथक घटनास्थळावर पोहोचून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध लावण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली जात आहे. वन विभागाचा पीटर नावाच्या श्वानाला घटनास्थळावर आणून परिसराचे निरीक्षण करण्यात आले आहे.