नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपने विधानसभेत गदारोळ केला. याच मुद्द्यावर आक्रमक होत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत नसताना अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेमध्ये विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागणीची आठवण करून देण्यासाठी विरोधकांनी वृत्तपत्राच्या कटिंगचे बॅनर तयार करून आणले होते. मुख्यमंत्री ठाकरेंनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. भाजपने सामना वर्तमानपत्राचे बँनर घेऊन सभागृहात प्रवेश केला होता. विधानसभाध्यक्ष नाना पटोलेंनी हाती घेतलेल्या आमदारांची नावे लिहून घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सभागृहातील घोषणाबाजी वाढतच होती.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : विधानसभेत सेना अन् भाजप आमदारामध्ये हाणामारी, गोंधळात कामकाज सुरू
शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि भाजपचे आ. हरिश पिंपळे यांच्यात हाणामारी झाली. आमदार संजय रायमुलकर यांनी भाजपच्या हातातील बॅनर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहाचे काम अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून आमदारांना शांत केले.