नागपूर : गेल्या १२ वर्षांपासून अशोक तेवानी पक्षांसाठी घरटे तयार करण्याचे काम करत आहेत. त्यांनी आजवर २१०० घरटे तयार केले आहेत. आता तर परिसरात लोक देखील रोज त्यांच्या घरी पत्रिकांचे गठ्ठे आणून देऊ लागले आहेत. सुरुवातीला बरेच वर्ष त्यांनी हे घरटे निशुल्क वितरित केले. मात्र, फुकट मिळालेल्या वस्तूंची लोकांना किंमत नसते, याबाबतीतील काही अनुभव त्यांना आले. त्यामुळे घरटे तयार करण्यासाठी लागणारे साहित्याची किंमत म्हणून ४० रुपये घेण्यास त्यांनी सुरुवात केली.
निवृत्तीनंतरचा प्लॅन : आपणही या समाजाचे काही तरी देणं घेणं लागतो, ही भावना जोपर्यंत मनात जागृत होतं नाही तोपर्यंत समाज उपयोगी काम तुमच्या हातून घडणार नाही, ही संकल्पना त्यांच्या मनात घर करून बसली होती. म्हणून त्यांनी चिमणी पाखरांसाठीचे घरकुल तयार करण्याचे काम सुरू केले. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर दिवसभराचा वेळ कसा घालवायचा? हा प्रश्न अनेकांना सतावतो. परंतु, अशोक तेवानी यांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन आधीच तयार करून ठेवला होता.
४० रुपयांमध्ये तयार होते घरटे : आतापर्यंत सुमारे २१०० घरटे त्यांनी लोकांना वितरित केले आहेत. दिवसभरातील पाच ते सात तास काम करून रोज एक ते दोन घरटे तयार करतात. त्या घरट्यात ज्यावेळी चिमणी राहायला येते, अंडी देते, किंवा लहान पाखरांचा जन्म होतो. ते व्हिडिओ लोक मला आवर्जून पाठवतात. ते बघून मला यापेक्षा आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते, ते बघून आनंद मिळतो. असे ते सांगतात.
चिऊताई नामशेष होण्याच्या मार्गावर : सुमारे तीस वर्षांपूर्वी लहान मुलांच्या भाव-विश्वातील एक महत्वाचा घटक म्हणजे चिमणी उर्फ चिऊताई आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किंबहुना ही चिऊताई आता तर दिसेनाशी झाली आहे. सकाळीच्या पहरी अंगणात चिऊताईचा किलबिलाट कानी पडला की, दिवसाची सुरुवात कशी प्रफुल्लित व्हावयाची मात्र,आता ना चिऊताई दिसते ना तिची किलबिलाट ऐकू येते. चिमणी पाखरांना वाचवा अशी ओरड रोज ऐकू येते, पण दुसऱ्या बाजूला त्या चिमणी पाखरांचा सुरक्षित अधिवास असलेले झाड यावेळी सर्रासपणे कापली जातात. त्यावेळी हा किती विरोधाभास आहे, हे लक्षात आल्यानंतर फार दुःख होते, असे अशोक तेवानी सांगतात.
हेही वाचा :