नागपूर- राज्यात सध्या बर्ड फ्ल्यूचा साथीने थैमान घालायला सुरुवात केली आहे. नागपूरसह राज्यातील ८ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थानच्या अहवालातून ८ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भोपाळच्या प्रयोगशाळेने हे रिपोर्ट राज्याकडे पाठवले आहेत. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील वारंगा येथील एका खासगी फार्म हाऊसवरील काही पक्ष्यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्या पक्ष्यांना बर्डफ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.काही दिवसांपूर्वी या फार्महाउस मधील पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रकरणात नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून प्रयोगशाळेने ते नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले आहे.
गडचिरोलीतही शिरकाव-
नागपूरसह गडचिरोली मध्येही एका ठिकाणी बर्डफ्लूचा शिरकाव झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर नागपुरातील वारंगा या गावातल्या 23 कोंबड्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आल्यानंतर या गावातील 460 कोंबड्यांना ठार मारण्यात आले आहे. वारंगा गावातील 23 कोंबड्या मृत झाल्या होत्या. त्यांचे नमुने 14 जानेवारीला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोंबड्यांना मारण्याची पद्धत
कोंबड्यांना ठार मारण्यासाठी सोडियम फिनॉल बार्बिटोन हे औषधच्या उपयोगात आणले जाते. या औषधाचे सेवन कोंबड्यांनी केल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर सर्व मृत कोंबड्यांना एका खड्डयात पुरले जाते. तो खड्डा पुन्हा कुणी खोदू नये या करिता देखील उपाययोजना केल्या जातात.