नागपूर - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी नागपूर मेट्रो सुरू करण्याच्या दिशेने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टिकोनातून मेट्रो प्रशासनाकडून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र, काम पूर्ण होणार का? हे पाहावे लागेल. आज 'माझी मेट्रो' प्रशासनातर्फे पत्रकारांना सीताबर्डी येथे कामाच्या आढावा विषयी माहिती देण्यात आली.
शहरातील मेट्रोच्या इंटरचेंज होणार असलेल्या मुंजे चौकातील स्टेशनच्या कामाचा आढावा आज घेण्यात आला. यावेळी ज्या वेगाने काम सुरू आहे ते पाहता मेट्रो प्रशासनाला उद्घाटनाची घाई झाल्याचे दिसून येत आहे. खापरी रेल्वे स्टेशन ते सीताबर्डी येथील मुंजे चौकापर्यंतच्या १३ किलोमीटर अंतरावरील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील रुळ बसवण्यात आली आहे. या मार्गावरील केवळ २ किलोमीटरच्या अंतरावरील रुळ बसवणे शिल्लक आहे. मेट्रोच्या एलिव्हेटेड पुलांवर विद्युतीकरण देखील वेगाने सुरू असले तरी अजूनपर्यंत मेट्रो स्टेशन अद्याप तयार झालेले नाहीत.
खापरी स्टेशन, न्यू एअरपोर्ट स्टेशन एअरपोर्ट साऊथ आणि अशा काही स्टेशन निर्मिती पूर्ण झाली आहे. तरी अजनी स्टेशन यासह अनेक स्टेशनचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. मात्र, ते काम लवकरात लवकर करण्याच्या उद्दिष्टाने मेट्रो प्रशासन कामाला लागले आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्याचा आटापिटा मेट्रो प्रशासनाकडून केला जात आहे.