नागपूर - महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळाली आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झालेल्या त्या यंदाच्या तुकडीतील देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अंतरा यांचे शिक्षण नागपुरातील माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचे पुढील शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने गरुड झेप घेतली. त्यांनी हैदराबादेतील कुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी 'पिलेटस पीसी -७', दुसऱ्या टप्प्यात 'किरण एमके -१' हे लढाऊ विमान उडविले आहे. त्यानंतर त्यांची लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली. सैन्यामध्ये दाखल होण्याची इच्छा असलेल्या मुलींसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.
कोण आहेत पहिल्या महिला लढाऊ वैमानिक -
भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या तिघी पहिल्या लढाऊ वैमानिक आहेत. भारत सरकारने प्रायोगिक तत्वावर महिलांना हवाई दलात प्रवेश देण्याचे ठरवले होते. त्यावेळी या तिघीनाही लढाऊ महिला वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल करण्यात आले. त्यानंतर २०१८ मध्ये प्रत्येकीने 'मिग-२१' हे लढाऊ विमान उडवले होते.
अवनी चतुर्वेदी या मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी हैदराबाद एअर फोर्स अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण केले. भावन कांत या बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असून त्यांनी बंगळुरू येथील बीएमएस महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. भावना यांनी देखील हैदराबाद येथून प्रशिक्षण पूर्ण केले. मोहना यांचे दिल्लीतील सैनिक स्कूलमधील प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. या तिन्ही महिला पहिल्या लढाऊ वैमानिक आहेत.