नागपूर - महाराष्ट्रात असलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी मंगळवार (ता. १९) रात्रीपर्यंत ३२५ रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आज ६० रेल्वे गाड्या रवाना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यांनी ही माहिती एका व्हिडीओ संदेशाद्वारे दिली आहे.
अनिल देशमुख म्हणाले, 'परप्रांतीय मजुरांसाठी १९ मेपर्यंत ३२५ गाड्या सोडण्यात आल्या आहे. या गाड्यामधून सुमारे ५ लाख प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यात आले आहे. याशिवाय आज ६० रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ज्या कामगारांनी नाव नोंदवले आहे, त्यांना प्रशासनातर्फे फोन आल्यावरच त्यांनी रेल्वेस्टेशनवर यायचे आहे. सोबतच त्यांच्या तिकिटाचा खर्च राज्य सरकार उचलत आहे.'
मुंबईत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर राहतात. या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची सोय करताना, मुंबई पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. कामाचा हा ताण कमी करण्याकरिता मंत्रालयातील दीड हजार कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या मदतीकरिता लावण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी मुंबईच्या वांद्रे स्टेशन परिसरात आपापल्या गावाला जाण्यासाठी परप्रांतीयांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पोलिसांना नाईलाजास्तवर सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवावी लागली होती.
हेही वाचा - दिलासादाक...! नागपुरात चोवीस तासात 61 रुग्ण झाले कोरोनामुक्त
हेही वाचा - कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्या 'त्या' सर्व 62 जणांची टेस्ट निगेटिव्ह