नागपूर - राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत योग्य तो निर्णय लवकर घ्यावा, शिवाय अंतिम वर्षाची परीक्षा घेऊन वेळीच निकाल देण्यात यावे. या मागणीसाठी अभाविपकडून आंदोलन करण्यात आले. नागपुरातील उच्चशिक्षण सहसंचालक विभागासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनालाही समर्थन देत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. शिवाय राज्य शासन अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत असल्याचा आरोपही करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून वेळोवेळी निर्णय बदलत आहेत. अशातच नुकतेच होऊ घातलेल्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच मुद्यावरून नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकरात लवकर घेऊन त्यांचे निकाल जाहीर करण्यात यावे. या मागणीसाठी अभाविपकडून उच्चशिक्षण सहसंचालक विभागात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंतिम वर्षाच्या परीक्षा तोंडावर असताना विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. हे दुर्दैवी असल्याचा आरोप यावेळी अभाविप कडून करण्यात आला. शिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांच्या भविष्याचे काय, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
राज्य शासनाने या सर्व बाबींवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी अभाविपकडून करण्यात आली. सोबतच या संदर्भात सहसंचालकांना निवेदनही देण्यात आले. त्याचबरोबर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा आंदोलन रास्त असल्याने त्यांचे प्रश्नही राज्य शासनाने मार्गी लावावे, अशीही मागणी यावेळी या आंदोलनात करण्यात आली. या आंदोलनादरम्यान राज्य शासन व शिक्षणमंत्री विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. शिवाय अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोपही अभाविपचे ईश्वर रेवनशेटे यांनी केला.
हेही वाचा - नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन; ७वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी