नागपूर - नुकताच सीबीएसईच्या दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी देखील मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. नागपुरातील भारती कृष्ण विद्या विहार येथे शिकत असलेली आर्या दाऊ हिने ९९.४१ टक्के मिळवत विदर्भातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामुळे तिचा शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जे. व्ही. नागालालक्ष्मी यांनी तिचे कौतुक केले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. या परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. यंदाही देशभरातून वेगवेगळ्या विभागातून मुलींनीच आघाडी घेतल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे. यात नागपूरमधील आर्या दाऊ या विद्यार्थीनीने ९९.४१ टक्के मिळवत विदर्भातून पहिली येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.