नागपूर - लहान मुलांच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भारत बायोटेक, एनआयव्ही आणि आयसीएमआरच्या माध्यमातून देशातील चार ठिकाणी लहान मुलांवर लसीची ट्रायल केली जाणार आहे. नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयातही ट्रायल होणार आहे.
बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खडतकर, मेडिट्रीना रूग्णालय संचालक डॉ. समीर पालतेवार, मेडिट्रिनाचे संचालक डॉ. आशिष ताजने यांनी याची माहिती दिली. या ट्रायलला सुरवात होण्यापूर्वी सर्व रुग्णालयातील सोयी सुविधा रिसर्चच्या अनुषंगाने तपासून येत्या दोन दिवसात परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनतर हे ट्रायल सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
देशात चार ठिकाणी होणार ट्रायल
'देशभरात चार ठिकाणी लहान मुलांसाठी भारत बायोटेककडून तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी होणार आहे. यासाठी देशभरात 525 मुलांची चाचणी केली जाणार आहे. यात 175 जणांचे तीन गट असणार आहेत. 208 दिवस हे ट्रायल चालणार आहे. सुरवातीला काही दिवस नाकाद्वारे लस दिली जाईल, अशी चर्चा होती. पण ही लस सध्यातरी टोचून दिली जाणार आहे. यात पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी चाचणी केली जाणार आहे', असे डॉ. वसंत खडतकरांकडून सांगण्यात आले आहे.
नागपूर, पटना, दिल्ली, हैदराबाद येथे होणार ट्रायल
'लहान मुलांची निवड करताना आई-वडिलांची परवानगी लागणार आहे. यासोबत 12 वर्षांच्या वरील मुलांचीसुद्धा परवानगी घेतली जाईल. ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात परवानगी घेतली जाणार आहे. यात तंदरूस्त मुलांची निवड केली जाईल. ज्यामध्ये सर्दी, खोकला नसलेले, यासोबत कोविड झालेला नसलेल्या मुलांची ट्रायलसाठी निवड केली जाणार आहे. नागपूर, पटना, दिल्ली, हैदराबाद येथे ट्रायल होणार आहे', अशी माहिती डॉ. वसंत खडतकर यांनी दिली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजचे ट्रायल होणार
भारत बायोटेकने केलेल्या पहिल्या फेजच्या चाचण्या पाहता 12 ते 62 वयोगटातील चाचण्या अगोदर झाल्या आहेत. आता 12 ते 18 वयोगटाचे ट्रायल होणार आहे. यामुळे फेज दुसरी आणि तिसरी असा अहवाल राहणार आहे. दरम्यान, पहिल्या फेजमध्ये 325 लोकांवर ट्रायल झाले. दुसऱ्या फेजमध्येही यांचे ट्रायल झाले. 18 वर्षापेक्षा वरील वयोगटातील 25800 लोकांचे तिसऱ्या फेजमध्ये ट्रायल झाले. यामुळे आता लहान मुलांसाठी ट्रायलला मदत मिळणार आहे. सोबतच यापूर्वी झालेल्या ट्रायलमध्ये ताप वगळता उलट काही परिणाम झाले नसल्याचेही सांगितले जात आहे.
हेही वाचा - राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन