नागपूर - महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील एका ९३ वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली. गेल्या काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. उपचारानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सकारात्मक दृष्टीकोण ठेवून कोरोनावर सहज मात करता येते, हे या आजोबांनी दाखवून दिले आहे.
आजोबांना कोविड-१९ची लक्षणे दिसल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली त्यामुळे त्यांना मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले. आईजीआरमध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. सुरुवातील त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली व ते कोरोनामुक्त झाले. त्यांना काल रात्री सुट्टी देण्यात आली, अशी माहिती डॉ. हरदास यांनी दिली.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० पेक्षा अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केले जात आहे. सध्या ४१ रुग्ण उपचार घेत आहेत.