नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोंडखैरी येथे अवैध आणि बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या वाहनासह या मालाची किंमत जवळपास 24 लाख रुपये असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली.
जकात कर विभागाला बोलेरो पिकअप व्हॅनमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. चंद्रपूर येथील एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारू साठा उपलब्ध असून अवैधरित्या वाटप होत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली, तेव्हा ट्रकच्या केबिनच्या मागील बाजूस एक विशिष्ट कप्पा बनवून त्यामध्ये दारूचे बॉक्स भरलेले होते.
याशिवाय शंभू सूर्यवंशी यांच्या मालकीच्या शेतातील घरात तपासणी केली असता अबकारी विभागाला देशी दारू साठा आढळून आला. या कारवाईत बोलेरो पिकअप गाडी, बारा चाकी ट्रक आणि टाटा कंपनीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी शंभू सूर्यवंशी, धीरज बहुरिया, सागर कुंबलवार, सागर बहरिया आणि नरेंद्र बर्मा यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे सुधारित 2005 चे कलम 65 (ई) (ए ) 81 व 83 नुसार कारवाई करण्यात आली आहे.