नागपूर - शहरात ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या तिघांच्या संपर्कात आलेल्या ४५० संशयितांना प्रशासनाने क्वारंटाईन केल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
नागपुरातील रेड झोन असलेल्यांपैकी मोमिनपुरा आणि सतरंजीपुरा या भागातून अजूनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुढे येत आहेत. काल नव्याने आढळलेले तीनही रुग्ण रेड झोन भागातील असल्याने महानगरपालिकेने त्यांच्या संपर्कातील ४५० जणांना क्वारंटाईन केले आहे. याशिवाय त्या भागतील १२०० संशयितांना क्वारंटाईन करणार असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
सतरंजीपुरा हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला आहे आणि याच भागातून सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंत ८० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागातील लोकांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन करून त्यांच्या तपासण्या करणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.