नागपूर - कापूस हे शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि महत्त्वाच्या पिकापैकी एक आहे. दरवर्षी राज्यात साधारण ४० ते ४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. मात्र, कापसाच्या लागवडीसाठी लागणारी जमीन ही निम्म्या प्रमाणात म्हणजे साधारणतः ४५ टक्के जमीन (उथळ) मुरमाड आहे. त्यामुळे ही जमीन कापसासाठी योग्य नसल्याचे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून समोर आला आहे.
शेती राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागाने केलेल्या अभ्यासानंतर हे वास्तव पुढे आले म्हणून राज्यात कापूस शेती ही तोट्यात चालली आहे. असा अहवाल राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागाने मांडला. या खळबळजनक वास्तवानंतर आता शेतकरी आणि सरकारपुढेही मोठा प्रश्व निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. आजपर्यंतच्या शेतकरी आत्महतेचा आकडा बघितल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्याच सर्वाधिक आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कापूस उत्पादनाला योग्य हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना मुरमाळ जमिनीत एकरी २-३ क्विंटलपेक्षा जास्त कापसाचे उत्पादन मिळत नाही. हे देखील वास्तव आहे. त्यामुळे या समस्येतून बाहेर पडण्यासाठी राज्यातील साधारण ४५ टक्के जमिनीत कापूस लाऊ नका, असा सल्ला राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागाने दिला आहे.