नागपूर - गरीब मुलीला नोकरीची गरज आहे. तिची मदत करा असा बनाव करून नागपूर शहरातील धनदंडग्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या हनी ट्रॅप टोळीच्या मुसक्या आवळण्यात नागपूरातील एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ही टोळी शहरातील व्यापारी आणि खासगी कंपनीचे अधिकारी यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत होती. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. शिवाय या टोळीचा म्होरक्या आणि आपल्या आकर्षणात अडकवून अनेकांची फसवणूक करणारी तरुणी अद्याप फरार आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी नागपूर शहरारील एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. पीडित व्यापाऱ्याचा म्हणणे होत की, 21 ऑगस्टला त्याच्या परिचयाच्या एका तरुणीने त्याला घरी भेटायला बोलावले. बोलवलेल्या ठिकाणी भेटायला गेल्यावर त्या तरुणीसोबत बोलत असताना अचानक त्या तरुणीचे काही सहकारी तिथे आले. त्यानंतर व्यापाऱ्याला तरुणीची छेड काढतो का, असे आरोप करत मारहाण सुरु केली. टोळीतील दोघांनी रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवत एटीएम कार्ड आणि त्याचा पिन नंबर बळजबरीने मिळवून घेतला. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याला त्याच घरात कोंडून ठेवत त्याच्या खात्यातील सुमारे एक लाख रुपये या टोळीने काढून घेतले. नंतर त्या व्यापाऱ्याला कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची भीती दाखवून सोडून देण्यात आले.
पीडित व्यापाऱ्याने खूप विचार केल्यानंतर हिंमतीने पोलिसांकडे येऊन तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी दोन दिवस शोध घेतल्यावर टोळीतील सुमित परिहार, गुंनु मंडल आणि तुषार जगताप या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर टोळीचा म्होरक्या रजत ठाकूर उर्फ अज्जू भाई आणि गरीब तरुणी म्हणून भेट घेऊन व्यापाऱ्यांकडे नोकरी मागणारी रिया नावाची तरुणी सध्या फरार आहे. या दोघांना अटक झाल्यानंतर या टोळीने आणखी किती व्यापाऱ्यांना याच पद्धतीने लुटले आहे हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचा कारण पुढे करून नोकरी मागणाऱ्या तरुणींपासून सावध रहा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - तुकाराम मुंढेंच्या अनुभवाइतक्या झाल्या बदल्या, वाचा नागपुरातून कशी झाली उचलबांगडी