नागपूर - कुपोषणमुक्तीकरता महिला बालकल्याण विभागातर्फे विविध पोषण आहाराच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यानंतरही कुपोषणमुक्ती होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यात १५१ बालक कुपोषित आहेत. तर नागपूर शहरालगत असलेला हिंगणा तालुका यामध्ये अव्वल आहे.
कुपोषणमुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रयोग राबविले जातात. अंगणवाड्यांतून पोषण आहार पुरविला जातो, असे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि अंगणवाडी परिचारिका सांगतात. मात्र, कुपोषणमुक्त होण्याऐवजी कुपोषित बालकांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कुठल्या स्तरावर यंत्रणा फोल ठरत आहे, याची शहानिशा करणे बालकल्याण विभागाला गरजेचे आहे.
कुपोषणतील तीव्र गटातील बालकांकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी केंद्र आहेत. यात कुपोषित बालक आणि त्यांच्या मातांना १४ दिवस भरती करून घेतले जाते. शिवाय बालक व मातेची दररोज तपासणी होते. त्यांना पोषण आहार दिला जातो. तज्ज्ञांकडून बालकाचे दररोज वजन व उंची मोजली जाते, अशी माहिला बाल कल्याण विकास विभागाचे अधिकारी भागवत तांबे यांनी दिली.