नागपूर - अनलॉकनंतर हळूहळू अतंर्गत एसटी बससेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर आंतरजिल्हा बससेवेलाही राज्य शासनाने परवानगी दिली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर आगारकडून लांब पल्ल्याच्या म्हणजे नागपूर ते पुणे या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय दिवाळीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे विभाग नियंत्रक, एमएसआरटीसी, निलेश बेलसरे यांनी सांगितले.
१५ बसेस नागपूर-पुणे मार्गावर धावणार
विशेष म्हणजे, नागपूर-पुणे मार्गावरील बसेस आता ऑनलाइन सुद्धा बुक करता येणार असल्याची माहिती नियंत्रकांनी दिली. आंतरजिल्हा बस सेवेला राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानंतर आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर विभागाकडून नागपूर-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेसच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या एकून ६ शिवशाही बसेसच्या संख्येत वाढ करून आता ही संख्या १५ इतकी करण्यात आली आहे.
ऑनलाइन बुकिंग करता येणे शक्य
नागपूर विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे विभाग नियंत्रकांचे मत आहे. विशेष म्हणजे, नागपूर-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेसचे आता ऑनलाइन बुकिंगसुद्धा करता येणे शक्य आहे. त्यामुळे, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी दिवाळी निमित्त ही खास व्यवस्था परिवहन विभागाने केली आहे. १०, ११, १२ आणि १३ नोव्हेंबर या तारखेला या अतिरिक्त बसेस धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली.
सर्व बसेस शिवशाही
या सर्व बसेस शिवशाही असून त्यांचे तिकीटदरही नेहमी प्रमाणेच असणार असल्याची माहिती बेलसरे यांनी दिली. शिवाय, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत बसेसमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारीही विभागाकडून घेण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.
दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तिकीटदरात वाढ करण्यात येते. परंतु, यंदा शासनाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे नियंत्रकांनी सांगितले. त्यामुळे, नागपूर-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. शिवाय, ऑनलाइन तिकीट बुकिंगमुळे या सेवेचा अधिकच लाभ सर्वसामान्यांना घेता येणार आहे.
हेही वाचा- नागपुरकरांच्या सेवेत 'आपली बस' : पहिल्या टप्प्यात 90 बस फेऱ्या सुरू