नागपूर - पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांपैकी नागपूर वर्धा आणि आता चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या सहा जिल्ह्यांत गुरुवारी चौदाशेच्या घरात रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 8 जणांचा मृत्यू झाला असून, 1070 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात दैनंदिन मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील 15 दिवसाचे प्रमाण पाहता फारशी घट झालेली नाही. दररोज सरासरी एक हजाराच्या वर रुग्णांची भर पडत आहे. मागील 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 1070 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणी अहवालातुन पुढे आले आहे. यामध्ये 223 रुग्ण हे ग्रामीण भागातील, 845 हे शहरातील तर 2 बाहेर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान गुरुवारी 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी चार जण हे शहरी भागातील आहेत, तर 2 नागपूर ग्रामिणमधले असून, दोन जन परजिल्ह्यातील आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध
नागपूर जिल्ह्यात कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता लग्न समारंभाराठी मंगल कार्यालय भाड्याने घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घरच्या घरी जरी लग्न करायचे असल्यास त्यासाठी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी आणि नगर परिषद क्षेत्रात मुख्याधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात लग्न करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पूर्व विदर्भातील आकडेवारी
पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यात गुरुवारी 1070 रुग्णांची भर पडली असून, 726 जन कोरोनामुक्त झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात 170 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 135 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 70 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भंडारा जिल्ह्यात 41 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 15 जणांनी कोरोनावर मात केली. गोंदीयात 14 जणांना सुट्टी झाली असून, 20 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. गडचिरोलीमध्ये दिवसभरात 18 नवे रुग्ण आढळले असून, 9 जणांनी कोरोनावर मात केली आहे.