नागपूर - हुतात्मा जवान भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. आज काटोल येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबीयांकडे मदतीचा धनादेश देण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामध्ये भूषण सतई हुतात्मा झाले होते.
सतई कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखाच्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत म्हणून वडील रमेश सतई आणि आई मीराबाई यांना प्रत्येकी 50 लाख अशी एक कोटी रुपयांची मदत केली आहे. आज त्यांना काटोल येथे आयोजित एका कार्यक्रमात धनादेश देण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने काटोल येथील पोलीस स्टेशन परिसरात आयोजित कार्यक्रमात भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना एकूण १ कोटी रुपयांची आर्थिक मदत शासनातर्फे देण्यात आली.
ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला भूषण यांना आले होते विरमरण
१३ नोव्हेंबर रोजी गुरेज सेक्टर श्रीनगर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारे जवान भूषण सतई यांना विरमरण आले होते. ते अवघ्या २८ वर्षांचे होते. भूषण सतई हे वयाच्या वीसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते.