मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19 हजार 460 इतकी पदे भरण्यात येणार आहेत. याविषयी जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहितीही महाजन यांनी दिली आहे.
गिरीश महाजनांनी दिली माहिती : या भरतीची माहिती देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गात पदे रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोनाचा आजार अशा विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत आता मेगाभरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी दि. 05 ऑगस्ट 2023 ते दि 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी हवी असेल अशा इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळाला भेट देऊन दि. 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक आर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत,अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर पाहता येणार असल्याची माहितीही महाजन यांनी दिली.
एकाच कालावधीमध्ये परीक्षा होणार : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे. यामुळे उमेदवारांनी एकाच पदाकरता अर्ज करावा. विनाकारण जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. जर उमेदवारांनी तसे केले तर त्यांना अर्ज शुल्कापोटी अनावश्यक खर्च येईल. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार आहे. तसेच उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केल्याने परीक्षा देता येणार नाही. कारण परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आला तर त्याठिकाणी परीक्षा देता येणार नाही. त्याला जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
परीक्षा अत्यंत पारदर्शक : परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया IBPS कंपनीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषास कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली. सन 2019 पासून परीक्षा झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र भावना असल्याचे मला माहिती आहे. त्यामुळे प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग) यांच्या माध्यमातून वारंवार IBPS तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन हा प्रश्न एकदाचा मार्गी लावलेला आहे.
हे उमेदवारही देऊ शकतील परीक्षा : ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या नोकरीसाठी अर्ज केलेला होता. परंतु आता त्यांचे वय निघून गेल्याने जे परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, असे उमेदवारही परीक्षा देऊ शकतील. अशा उमेदवारांना दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत पात्र धरण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी मार्च 2019 च्या परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही. त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
हेही वाचा-