मुंबई - उद्धव ठाकरेंचे मातोश्री हे निवसास्थान ज्या मतदारसंघात आहे, त्या वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी तीनही पक्षांनी मतभेद बाजूला ठेऊन एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्राला प्रगतीच्या एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असाही विश्वास त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
अत्यंत अटीतटीची ठरलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दिकी निवडून आले. काल (बुधवार) विधानसभेत झालेल्या शपथग्रहण समारंभावेळी झिशान आदित्य ठाकरेंसोबत होते. शपथविधी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना झिशान सिद्दिकी यांनी आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीचा गौप्यस्फोट केला. शिवाय माझ्या मतदारसंघातील नागरिकाला राज्यातील सर्वात मानाचे स्थान असलेल्या मुख्यमंत्रिपदाचा सन्मान मिळत असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन केले. तीन विभिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र होऊन महाविकास आघाडी स्थापन केली असली तरी राज्याचा संबंधित विकास आमच्या अजेंड्यावर सहमतीचा विषय आहे. त्यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय नवे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास झिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र असलेले झिशान सिद्दीकी यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली असून आपल्या वडिलांच्या आक्रमक स्वभाव प्रमाणेच विधानसभेत प्रश्न मांडून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणार असल्याची भावना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला ७०० शेतकऱ्यांना निमंत्रण