मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण दूर करून त्यांच्यात पुन्हा ऊर्जा निर्माण करण्यासाठी काँग्रेसच्या युवक प्रदेशची बैठक होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा ताकतीने उभे करण्यासाठीचा कार्यक्रम तरुण कार्यकर्त्यांना दिला जाणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पराजयानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या युवक काँग्रेस तसेच एनएसयूआय आदी विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दादर येथील टिळक भवनात होत आहे. या बैठकीत राज्यातील तरुणांना पुन्हा एकदा नव्याने उभे करण्यासाठी कार्यक्रम दिला जाणार आहे. या कार्यक्रमातून विधानसभेला पुन्हा एकदा ताकदीने उभे राहिले पाहिजे, यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
मागील ५ वर्षात भाजपने केंद्रात आणि राज्यात तरुणांची मोठी फसवणूक केली. हे सरकार आल्यापासून उच्च शिक्षणातील दर्जा खालावला असून विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निर्माण झाला. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातही कुठले प्रश्न सोडवले नाहीत तर दुसरीकडे उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरूणांना नोकरी मिळत नाही. म्हणून तो निराशेच्या गर्तेत सापडला आहे. एकीकडे नोकरी नाही आणि रोजगार मिळत नाही आणि दुसरीकडे गावी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या सरकारने राज्यातील तरुणांची केली आहे. त्यामुळे आज होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
आज राज्यात आमचा बूथ स्तरावरील कार्यकर्ता हा एक विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करत असून पुन्हा एकदा राज्यात काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव निर्माण करेल. आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम ठरवत असून त्यानिमित्ताने काँग्रेसला पुन्हा राज्यात उभे करू, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.