मुंबई - केंद्र सरकारच्या कामगार धोरणाच्या निषेधार्थ आज (८ जानेवारी)ला कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. मात्र, आज सकाळी शहरातील अनेक ठिकाणी दुकाने उघडण्यास सुरुवात झाली. तसेच शाळा, महाविद्यालये देखील सुरू आहेत. रेल्वे वाहतूक, बससेवा देखील सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजल्यानंतर संपाचा परिणाम दिसू शकतो.
काँग्रेस मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने करणार आहे. या संपामध्ये राज्य सरकारी रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारीही सहभागी होणार असल्याचे त्यांच्या संघटनांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. वाहतूक सेवेचा विचार केल्यास संपाला रेल्वे, एसटी कामगार आणि बेस्ट संघटनांनी पाठिंबा दिला. मात्र, प्रत्यक्ष संपात सहभागी होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील रेल्वे, बेस्ट आणि राज्यातील एसटी सेवा सुरळीत सुरू राहणार आहे.