मुंबई - हार्बर आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून किंमती सामान तसेच पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. वडाळा रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. यास्मिन पाशा शेख (वय - 37, रा. शिवाजीनगर, गोवंडी), असे या महिलेचे नाव आहे. यावेळी आरोपी महिलेकडून ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 46 हजार रुपये 570 रुपये असा रोख ऐवजही जप्त केला आहे. संपूर्ण चौकशीदरम्यान तिच्याकडून जवळपास ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. काही चोर या गर्दीचा फायदा घेत असतात. मध्य आणि हार्बर मार्गावरही प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. याचाच फायदा घेत आरोपी महिला यास्मिन शेख ही महिलांच्या डब्यात महिलांचे मंगळसूत्र तसेच मौल्यवान सामान, मोबाईल चोरत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - कन्नड-चाळीसगाव घाटात कार 200 फूट दरीत कोसळली; एक ठार, एक गंभीर
यासंदर्भात 26 जानेवारीला वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात एका महिलेच्या मंगळसूत्र चोरीच्या तक्रारीवरून वडाळा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात सीसीटीव्ही कॅमेरात एक चेहरा झाकलेली महिला दिसून आली होती. अगोदरच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेली यास्मिन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. यानंतर विशेष पथक बनवून आरोपी महिलेच्या मार्गावर सापळा रचून तिला शिवाजी नगर गोवंडी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणच्या गुन्ह्यातील 162 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 95000 हजार रुपये रोख ऐवज मिळून आला आहे. तिच्याकडून एकूण 7 लाख 74 हजार 670 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री महाबळेश्वरमध्ये, मात्र पर्यटक झाले नाराज
एवढेच नव्हे तर या महिलेवर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या विविध पोलीस ठाण्यात एकूण 53 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.