मुंबई - मुसळधार पावसामुळे घाटकोपरमध्ये एक महिला गटारावरील झाकण उघडे असल्याने त्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली होती. तब्बल दोन दिवसांनंतर त्या महिलेचा मृतदेह हाजीअली येथील समुद्रात आढळला आहे. शीतल जितेश भानुशाली असे या 32 वर्षीय महिलेचे नाव आहे. दागिने आणि कापड्यांवरून शीतलच्या घरच्यांना तिची ओळख पटली. अशाप्रकारे गटारातून वाहून जाऊन अनेक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शीतल भानुशाली शनिवारी संध्याकाळी आपल्या मुलासह गिरणीमध्ये दळण घेऊन गेल्या होत्या. काही वेळाने त्यांच्या मुलाला घरी पाठवून दिले आणि दळण दळेपर्यंत त्या गिरणीत थांबल्या. दळण घेऊन घरी येत असताना संध्याकाळी सातच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर, चाळीत मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. या वेळी त्यांच्या कुटुंबाने फोनवर त्यांच्याशी संपर्क केला, तेव्हा पावसामुळे त्या एक ठिकाणी निवाऱ्याला उभ्या असल्याचे कळाले. मात्र, हा त्यांचा कुटुंबाशी हा शेवटचा संपर्क होता. त्यानंतर त्या रात्री घरी परतल्याच नाही. त्यांचे कुटुंब वारंवार त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्या आढळल्या नाहीत. अखेर कुटुंबीयांनी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्यात त्या हरविल्याची तक्रार दाखल केली. सकाळी ते पुन्हा शोध घेऊ लागले असता त्यांना एका गल्लीत अर्धवट उघडलेल्या गटाराच्या झाकणाच्या बाजूला त्यांची दळणाची पिशवी पडलेली आढळली. हे गटार साधारणतः चार फूट खोल होते आणि शनिवारी त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी देखील वाहत होते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेले चार दिवस हे झाकण उघड्या स्थितीत होते. यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्वरित घाटकोपर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दल, पालिका कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी या महिलेचा गटारात उतरून शोध सुरू केला. मात्र, काहीच हाती लागले नाही. रविवारी संपूर्ण दिवसभर अग्निशमन दल आणि पालिका शोधकार्य करत होते. अखेर सोमवारी सकाळी या महिलेचा मृतदेह हाजी अली येथे समुद्रात आढळला. याबाबत पोलिसांना याबाबत संपर्क साधला असता याप्रकरणी तपास करत असल्याचे सांगितले. तर, याप्रकरणी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत कोणी दोषी आल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
यापूर्वी 2017 मध्ये मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला होता. घरी जात असताना, एल्फिन्स्टनमधील मॅनहोलमध्ये पडून ते वाहून गेले होते. याचबरोबर गेल्यावर्षी जुलैमध्ये गोरेगाव पूर्व आंबेडकर नगरमध्ये उघड्या गटारामध्ये पडून ३ वर्षांचा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. दिव्यांश असे त्या मुलाचे नाव होते. दरवर्षी मुसळधार पावसात अनेक मुंबईकर बेपत्ता झाल्याच्या घटना समोर येतात. पालिकेने फायबरची गटारावरील झाकणे, तुटलेली झाकणे या बाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.