मुंबई - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेने संमत केलेले डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ आणि त्यासोबतच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ही विधेयके विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना संमत करण्यात आली.
2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर विधयेक 2020 हे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत मांडले. या विधेयकावर सहा महिन्यात इतिवृत्त सादर करून त्यासाठीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. तर सभागृहात हे विद्यापीठ विधेयक मांडल्यानंतर कोणत्याही सदस्यांनी चर्चा न करताच हे विद्यापीठ विधेयक मंजूर करण्यात आले.
राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे विधेयक ही तसेच मंजूर करण्यात आले. क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडले होते. या विधेयकावर ही कोणतीही चर्चा झाली नाही. या विधेयकातून मल्लखांब खेळाडूंना खेळाडूचा दर्जा दिला जाणार असल्याचे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.
ही विधेयकं संमत
विधान परिषदेत आज या विद्यापीठ विधेयकांसोबत सोबतच महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2020, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका, महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2020 हेही संमत करण्यात आले. तर विधानसभेमध्ये संमत करण्यात आलेल्या विधेयकामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक 2020 तसेच महाराष्ट्र नगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक 2020 तसेच मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2020 तसेच महाराष्ट्र सरकार सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक 2020 संमत करण्यात आले. यासोबतच महाराष्ट्र सहकारी संस्था (पाचवी सुधारणा) विधेयक ही परिषदेमध्ये संमत करण्यात आले.
हेही वाचा - ऊसतोड कामगारांसाठी येत्या अधिवेशनात कायदा; धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत घोषणा
हेही वाचा - शक्ती विधेयक चिकित्सा समितीकडे; 1 मार्च रोजी पुढचे अधिवेशन