नवी मुंबई - प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या मदतीने सख्या भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सानपाड्यात घडली आहे. पीडित व्यक्तींने केलेल्या तीव्र प्रतिकारानंतर आरोपी आणि त्याचा मित्र पळून गेला. विशेष म्हणजे गंभीर जखमी पीडित व्यक्ती डोक्यात झालेले कोयत्याचे वार आणि मानेत खुपसलेला चाकू तसाच घेऊन रुग्णालयात पोहचला. डॉक्टरांच्या टीमने प्रसंगावधान दाखवत पीडित व्यक्तीचे प्राण वाचवले आहे. सानपाडा सेक्टर पाचमध्ये संपत्तीच्या वादातून भावानेच भावावर हा जीवघेणा हल्ला केला आहे.
जीवघेणा हल्ला - शनिवारी सकाळी तेजस जयदेव पाटील याच्यावर त्याच्या राहत्या घरी हा हल्ला करण्यात आला. तेजस याचा सख्खा लहान भाऊ मोनिश पाटील याने आपला मित्रा महेश कांबळे याच्या मदतीने हा जीवघेणा हल्ला केला. या दोघांनी तेजस झोपला असल्याचा फायदा घेत कोयता आणि चाकूने हल्ला चढवला. हा हल्ला सुरू असताना तेजसने भाऊ मोनिश आणि महेशचा तीव्र प्रतिकार केला. या झटापटीत तेजसच्या प्रतिकाराला घाबरत दोन्ही हल्लेखोरांनी पळ काढला. मात्र तोपर्यंत तेजसच्या डोक्यात कोयत्याने अनेक वार करण्यात आले होते आणि त्याच्या मानेच्या उजव्याबाजूला चाकू खुपसण्यात आला होता. मानेत घुसलेला चाकू तसाच घेऊन बाईकद्वारे तेजस सानपाड्यातील एमपीसीटी रूग्णालयात दाखल झाला. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांच्या टीमने तेजसवर शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचवले. मानेत घुसलेल्या चाकूमुळे तेजसच्या मेंदूला जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीला इजा न झाल्याने जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मानेत घुसलेला चाकू - याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात फरार आरोपी मोनिश पाटील आणि महेश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीसीटी रुग्णालयामधील तेजसवर उपचार करणाऱ्या डॉ. आदित्य पाटील ( न्युरो सर्जन ), डॅा मोनियल अजय भुता (इंटरव्हेश्नल रेडियोलॅाजिस्ट), डॅा विनोद पाचार्डे( प्लास्टिक सर्जन ), डॅा भास्कर( कॅडिओक सर्जन ) यांच्या टीमनं हे ऑपरेशान केले. तेजस पाटील याच्या मानेत घुसलेला चाकू नातेवाईकांनी घरीच काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जास्त खोलवर घुसल्याने त्यांना यश न आल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. हा चाकू न काढता तेजस हॉस्पिटलमध्ये आल्याचा त्याला फायदा झाल्याचेही डॉक्टर म्हणाले.
चार तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी - मानेतून चाकू काढताना, आजूबाजूच्या नस तसेच धमन्यांना इजा पोहचण्याचा धोका होता. त्यासाठी आम्ही खूप काळजी घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही काळजी घेतली गेली नसती अथवा तेजसचे दैव बलवत्तर नसते तर त्याला कायमचे अपंगत्व किंवा जीवही गमवावा लागला असता. कारण मानेत खुपसलेला चाकू थेट मनक्याच्या हाडापर्यंत पोहोचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हा चाकू बाहेर काढताना ताकद लावून काढावा लागला. अशा परिस्थितीत मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्यांना इजा झाली तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. सुदैवाने तेजसच्या बाबतीत असे काही झाले नसून चार तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर तेजसला आयसीयूत हलवण्यात आले होते. सद्या तो आयसीयूमधून बाहेर आला असून त्याला बोलताना तसेच जेवण करताना कोणताही त्रास होत नसल्याचे डॉक्टर म्हणाले.