मुंबई- राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहता चाचण्या करण्यासाठी मुंबईत आणि पुण्यामध्ये लॅबची आणि लागणाऱ्या यंत्रांची संख्या येत्या बुधवारपर्यंत वाढवण्यात येईल. तसेच, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मनोरंजनासाठी आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना विषाणूचे रुग्ण शहरासह राज्यात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दोन तास आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईत ९ आणि राज्यात ३२ कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती त्यांनी दिली. कस्तुरबा रुग्णालयात ८० संशयित रुग्ण भरती असून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. दुबईला जो ग्रुप गेला होता त्यांच्यामुळे कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. मुंबईत असलेल्या ९ रुग्णांमध्ये २ कुटुंबामधील ५ रुग्ण असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.
कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा ही राज्य पातळीवरची प्रयोगशाळा आहे. येथे कोरोना विषाणूबाबत पॉझेटिव्ह, निगेटिव्ह अहवाल मिळतो. त्यामुळे, प्रयोगशाळेत सर्व उपकरणे, साधने उपलब्ध आहेत का याचीसुद्धा आपण पाहाणी केली. त्याचबरोबर, रुग्णालय प्रशासनाशी सद्या परिस्थिती बाबत चर्चा केली असल्याचे देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कस्तुरबा रुग्णालयात सध्या ओपीडी सेवा सुरू आहे. त्यात दिवसाला ३५० लोक येत आहेत. रुग्णालयात सध्या दिवसाला १०० चाचण्या होतात, त्या वाढवण्यात येतील. त्यासाठी नवीन चाचणी मशीन घेणार आहोत. त्यामुळे, २५० टेस्ट अधिक होतील, तसेच केईएमम रुग्णालयामध्येही १०० चाचण्या होतील. या दोन्ही ठिकाणी बुधवारपासून ३५० पेक्षा जास्त चाचण्या केल्या जातील. मुंबईत जेजे रुग्णालय आणि हाफकीन इन्स्टिट्यूट, तसेच पुण्यातही नवीन केंद्र सुरू केले जाईल. रुग्णालयात मास्क आणि पीपीपी सूट योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत. राज्य सरकारकडून काळजी घेतली जात आहे, असही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, विमानतळावरून आलेल्या प्रवाशांना अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात आणले जात असून त्यांची देखरेख केली जात आहे. या रुग्णालयात देखील ४०० बेड असून ती संख्या १००० पर्यंत वाढविली जाणार आहे. कोरोना विषाणू हा ८० टक्के माईल्ड, १४ टक्के गंभीर आणि ५ टक्केच क्रिटिकल असतो, त्यामुळे नागरिकांना याला घाबरू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. याच बरोबर सोलापूर, धुळे औरंगाबाद आणि मिरजमध्ये कोरोना विषाणू तपासणीच्या लॅब निर्माण केल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली.