मुंबई - बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने नव्या बसेस घेण्याचा सपाटा लावला आहे. बेस्ट सीएनजी व डिझेलवर धावणाऱ्या 1 हजार एसी बसेस भाडे तत्वावर घेणार आहे. बेस्ट परिवहन विभागाकडे सीएनजी पंपाच्या अपुऱ्या संख्येमुळे भविष्यात वाढणाऱ्या बसेसमध्ये सीएनजी गॅस कुठे भरायचा हा प्रश्न बेस्ट उपक्रमाला पडला आहे.
हे ही वाचा - बेस्ट परिवहन उपक्रमात इलेक्ट्रिकल बस दाखल
मुंबईत 15 बेस्ट आगारात सीएनजी गॅस भरण्याचे पंप उपलब्ध आहेत. सीएनजी गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून बेस्टने बस आगारातच सीएनजी पंप उभारून द्यावेत, अशी मागणी महानगर गॅस लि. कंपनीकडे करणार असल्याची माहिती बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत दिली.
हे ही वाचा -बेस्ट कामगारांचा वेतनकरार राजकारण करण्यासाठीच - विरोधी पक्षनेत्यांचा आरोप
सोमवारी डिझेलवर धावणाऱ्या 500 मिडी बसेस भाडे तत्वावर घेण्याचा 955 कोटी 8 लाखांचा प्रस्ताव बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला. तर मंगळवारी सीएनजीवर धावणाऱ्या 500 मिडी बसेस घेण्याचा 1067 कोटी 52 लाखांचा प्रस्ताव बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला. पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर 1 हजार एसी बसेस डिसेंबरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
हे ही वाचा - बेस्ट कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; गरज पडल्यास संपावर जाण्याचा इशारा