मुंबई: खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ते आज आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या संदर्भाने बोलताना राऊत म्हणाले "ते चौकशीसाठी गेलेत चांगली गोष्ट आहे. तसे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. राजभवनाकडे निघालेल्या पैशांना मध्येच कुठे पाय फुटले ते देखील समोर येईल. राज्याच्या तपास यंत्रणा अशा गुन्ह्यांचे तपास करण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे थोडा धीर धरा सत्य लवकरच समोर येईल." असेही राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप काही म्हणू शकते : जेम्स लेन (James Lane) विरुद्ध बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) प्रकरणी शरद पवारांवर गुन्हे दाखल करण्याच्या भाजपच्या मागणी वर बोलताना राऊत म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी काही मागणी करू शकते त्यांच्या म्हणण्यावर राज्य चाललेले नाही. इथे कायद्याचे राज्य आहे."
ज्यांना जायचं त्यांनी जावं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "अयोध्येचा हा पॉलिटिकल मुद्दा नाही. शिवसेना नेहमीच आयोध्येला जात आली आहे. आता कोण आपला राजकीय अजेंडा घेऊन तिकडे जात असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. कोणालाही कुठेही सभा घेऊ द्या या देशात लोकशाही आहे. इथे सभा घ्यायला बंदी नाही. त्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची आहे त्यांना ती घेऊ दे " असेही राऊत यांनी स्पष्ट केले