मुंबई - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत ( Mumbai Assembly Winter Session 2021 ) सुरू आहे. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशीही विरोधक ( Maharashtra Assembly Session Thired Day ) आक्रमक होताना दिसून आले. त्यांनी विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर गेल्या दोन दिवसांप्रमाणे आजही विधानसभेत 31 हजार कोटींच्या पूरवणी मागण्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यासोबतच अनेक प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, निलंबित 12 आमदारांचा मुद्दाही आज विधानसभेत गाजला. यावेळी विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, सरकारकडून ही मागणी फेटाळून लावण्यात आली.
- 'कर्मचारी झोपा काढतात काय?' अजित पवारांचा सभागृहात सवाल
विधानसभेत सोशल डिस्टंसिंगमुळे सदस्यांना अंतर ठेवून बसावे लागत आहे. काही सदस्य प्रेक्षकांच्या गॅलरीत पहिल्या मजल्यावर बसले आहेत. या सदस्यांना प्रश्नोत्तराच्या पत्रिका न मिळाल्याने आमदार किशोर जोरगिरवार यांनी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनीही पाच दिवसाच्या अधिवेशनात आमदारांना प्रश्नपत्रिका मिळू नयेत, याबाबत रोष व्यक्त केला. कर्मचारी झोपा काढतात काय, असा सवाल उपस्थित केला. तसेच सोमवारपासून प्रेक्षक गॅलरीतील सदस्यांना सभागृहात बसता येईल, अशी व्यवस्था करावी अशी विनंतीही केली.
- कोरोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये? -
काल सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कोरोनाला गांभिर्याने घेण्याची विनंती केली होती. तसेच सभागृहात मास्क न घालणाऱ्या सदस्यांना कान पिचक्याही दिल्या होता. दरम्यान, आज कॅबिनेटमध्ये कोविडबाबत चर्चा झाली. यामध्ये 18 टक्के रुग्ण दरदिवशी वाढत आहेत. तिसरी लाट ही जानेवारीमध्ये येऊ शकते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल रात्री टास्क फोर्सही बैठक घेतली, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
- भांडूप घटनेचे पडसाद आजही -
मुंबईतील भांडुप येथील सावित्रीबाई फुले रूग्णालयात नवजात बालकांच्या मृत्यूंचे प्रकरण काल विधानसभेत गाजले होते. आज आरोग्य समितीचे अध्यक्ष राजुल पटेल यांना पालक भेटले असता, रुग्णालयात आम्ही तुमच्या मुलांना दाखल करण्यास सांगितले होते का, असा प्रश्न त्यांनी पीडित पालकांना केला. यावरून आमदार भारती लव्हेकर यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. तसेच सरकारने या असंवेदनशील वर्तवणुकीची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
- आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना चार लाखांपर्यंत मदत? -
राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले जून ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे आढळून आली त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने 491 प्रकरणे पात्र ठरवले एकूण 200 13 प्रकरणे अपात्र ठरले असून 372 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. तर 482 प्रकरणी मदतीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली. मात्र, शेतकऱ्यांना देण्यात येणारे एक लाखाची रक्कम ही कमी आहे शेतकऱ्यांना तीस हजार रुपयांचा धनादेश दिला जातो आणि 70 हजार रुपये बँक खात्यात जमा केली जातात. ज्याचे व्याज पाचशे रुपये घेतात. हे अत्यंत कमी असून याच्यात कशी वाढ करता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना चार लाख रुपये मदत कशी देता येईल याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून धोरण ठरविण्यात येईल असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिले.
- '...तर महाराष्ट्रातील तरुण बेळगावात जाईल' -
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची अवमाना केल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला होता. यावरून वादळी चर्चाही झाली होती. तर आज तिसऱ्या दिवाशी आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत बेंगलोरमधील घटनेनंतर बेळगावातील तरुणांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात आहे. त्यांना घरात घुसून अटक केली जात आहे, या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सरकारच्यावतीने विनंती करण्यात यावी, तसेच कर्नाटक सरकारशी चर्चा करून या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा महाराष्ट्रातील तरुण या तरुणांच्या मदतीला गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी सभागृहात दिली.
- ३१ हजार २९८ कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य
पुरवणी मागण्यांच्या चर्चे दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुंगटीवार यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. यावेळी बोलताना त्यांनी पीएससी सेंटर यंत्र खरेदी, कोरोनाकाळातील जीआर नुसार न झालेली नोकरभरती, ऑक्सिजन प्लांट, पेट्रोल-डिझेल दरवाढ, यासह विविध मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच कोरोना मृतांच्या नातेवाईकांना अद्याप पैसे मिळालेले नाही. कोरोनासाठी केवळ निधी देऊन होत नाही. त्यासाठी नियोजन करावे, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. कोरोनासाठी विधीमंडळ समिती तयार करावी आणि त्यानुसार जिल्हानिहाय समस्या सोडवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. यासह काल उपमुख्यंत्री अजित पवार यांनी सर्व सदस्यांना मास्क लावण्याची विनंती केली होती. यावरूनही मुंगटीवार यांनी उमुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 'एकीकडे उपमुख्यंत्री सर्व सदस्यांना मास्क लावण्याची विनंती करतात, तर दुसरीकडे विधानसभेतील सॅनिटाईझेशन मशिन बंद आहे', असे ते म्हणाले. यावेळी ३१ हजार २९८ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा - Winter Session 2021 Extension : लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील -मुनगंटीवार