मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत ईडी कार्यालयात येतोय अशी हाक दिल्यानंतर देशाच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली होती. पहिल्यांदाच दिल्लीचे तख्तही हलल्याचे चित्र समोर आले होते. यामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात पडले आहेत. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या राजीनाम्याविषयी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याविषयी काही माहिती देण्यास नकार दिला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि इतर नेत्यांनाही अजित पवार यांच्या राजीनाम्याने संभ्रमात टाकले आहे. मुंबईत सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना साथ देण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक येथील बंगल्यावर जमा झाले होते. त्यावेळीही अजित पवार हे गैरहजर राहिल्याचे दिसून आले. मात्र, ते मुंबईत असल्याची भणक कोणालाही लागण्यापूर्वीच त्यांनी विधानसभेत येऊन विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपला फोनही बंद करुन ठेवला. त्यामुळे याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, आमदार प्रकाश गजभिये आदींनी याविषयी संपर्क साधला असता त्यांनीही नेमके कारण आपल्यालाही माहित नसल्याचे सांगितले. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.
अजित पवार यांनी मागील काही दिवसांमध्ये पुणे आणि जिल्ह्यांमध्ये पक्षाचे अनेक मेळावे घेतले. पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण केले. पुण्यातील काल आलेला पूर आणि बारामती आदी परिसरातील परिस्थितीवर ते कायम लक्ष ठेवून होते. तर मागील आठवड्यात झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या जागा वाटपाच्या झालेल्या बैठकांनाही ते हजर राहिलेले आहेत. अशा स्थितीत अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात सापडले आहेत.