मुंबई : भारतीय रेल्वेची अर्ध-द्रुतगती ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस २०१९ मध्ये पहिल्यांदा धावली. तेव्हापासून आतापर्यंत अनेक मार्गावर ही एक्सप्रेस धावत आहे. प्रवासामधील वेळ वाचत असल्याने प्रवाशांचा या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मध्य रेल्वेवर ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सध्या तरी धावू शकणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना या ट्रेनची आणखी काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र रेल्वेने तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर ही ट्रेन मध्य रेल्वे मार्गावर चालवावी अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनेकडून करण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या मेक इन इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून ह्या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास व निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. ही ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने धावते. या गाडीचे सर्व डबे वातानुकूलित आहेत. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिडीओ प्रणाली, स्वयंचलित खिडक्या दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही, इमरजन्सी पुश बटन, व्हॅक्युम सुविधा असलेले शौचालये, १८० अंश फिरणारी आसने आदी सुविधा या ट्रेनमध्ये आहे. या ट्रेनच्या धावण्याच्या गतीमुळे हजारो प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार आहे.
हे आहे कारण : रेल्वे मंत्रालयाने यावर्षी एसी स्लीपर सह वंदे भारत ट्रेनच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई ते फिरोजपूर आणि मुंबई ते पुणे या मार्गावर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सुरु झाल्याने प्रवाशांचा प्रवासामधील सुमारे अडीच तासाचा वेळ वाचणार आहे. मात्र मुंबई पुणे मार्गावर लोणावळा आणि खंडाळा यासारखे मोठे घाट आहेत. या घाटावर मेल एक्सप्रेस गाड्यांना आणखी एक अतिरिक्त इंजिन लावावे लागते. दोन इंजिन लावल्यावर मेल एक्सप्रेससारख्या ट्रेन हे दोन्ही घाट पार करतात. वंदे भारत एक्सप्रेस ही ईएमयू मध्ये मोडते. रेल्वेच्या साध्या आणि एसी लोकल याच प्रकारामध्ये मोडतात. त्यामुळे ही ट्रेन घाटमाथ्यावर चालवणे धोकादायक आहे. रेल्वे बोर्ड त्यावर अभ्यास करता असून तोडगा काढण्यासाठी चाचपणी सुरु असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
तांत्रिक अडचणी दूर करा : दिल्ली ते मुंबई अशी पश्चिम रेल्वेवरून राजधानी एक्सप्रेस आणि ऑगस्टक्रांती एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर घाट असल्याने ही सेवा मध्य रेल्वेवर सुरु करता येणार नाही, असे कारण रेल्वे प्रशासनाने दिले होते. प्रवासी संघटनांनी मागणी लावून धरल्यावर तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. घाट विभागात अतिरिक्त इंजिन लावून राजधानी एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. अशाच प्रकारे तांत्रिक अडचणी सुरू करून वंदे भारत एक्सप्रेस चालवावी. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबई ते पुणे, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे मातरम् सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करायला हवी, अशी मागणी रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली आहे.
२०२३ सालापर्यंत ७५ गाड्या चालवणार : १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी या शहरांदरम्यान धावली. नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-कटरा, पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर गुजरात, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेवर नागपूर ते बिलासपूर आदी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग १३० किमी प्रति तास इतका असून २०२३ सालापर्यंत ७५ गाड्या चालवण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे.
हेही वाचा : Morena Rail Accident : तेलंगणा एक्स्प्रेसचा अपघात, इंजिनसह 7 डबे झाले वेगळे