मुंबई - कोरोना काळात देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नयेत म्हणून, देशातील विविध भागातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पश्चिम रेल्वेने युद्धस्तरावर मालगाड्या चालवत आहे. या अतंर्गत 1 एप्रिल ते 10 मेपर्यंत एकूण 8 मिलियन टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. यामध्ये 23 कोव्हिड-19 पार्सल गाड्या, 20 दूध विशेष गाड्या, 38 किसान रेल्वेचा समावेश आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
8 दशलक्ष टन अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक-
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध कानाकोपऱ्यात सुमारे 98 पार्सल गाड्या चालवण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 5.22 दशलक्ष टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक केली आहे. खते, औषधे, मासे, दूध, धान्य, खाद्यपदार्थ यांचा यात समावेश आहे. यामधून एकूण 12 कोटी 44 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. भारतीय रेल्वेने यादरम्यान 38 किसान रेल्वेही चालविल्या. यातून सुमारे 8 हजार 733 टन सामग्रीची वाहतूक करण्यात आली आहे. 23 कोव्हिड 19 पार्सल गाड्या चालविण्यात आल्या, यातून 4 हजार 593 टन वजनी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. यासोबतच 20 दूध विशेष गाड्या चालवून सुमारे 14 हजार टन वजनी दुधाची वाहतूक करण्यात आली. अशाप्रकारे मागच्यावर्षी 1 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत 5.22 दशलक्ष टन अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक केली असून 53.56 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
85.43 दशलक्ष टन वस्तूची वाहतूक -
मागील वर्षी कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद होती. मात्र देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी पार्सल आणि मालगाड्या सुरू होत्या. देशभरात अन्नपदार्थांचा व आवश्यक वस्तूंचा साठा पुरवण्यासाठी 22 मार्च 2020 ते 23 एप्रिल 2021 पर्यंत 85.43 दशलक्ष टन आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली, यासाठी मालगाडीचे एकूण 37 हजार 748 रेक चालविण्यात आले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.