मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी उद्या (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamta Banarjee) आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेण्याची शक्यता -
बुधवारी दुपारी तीन वाजता ममता बॅनर्जी या शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट होणार आहे. तसेच उद्या ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी एका महत्त्वाच्या बिजनेस मिटसाठी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हजेरी लावणार आहेत. त्याच बरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या रिसेप्शन कार्यक्रमाला सुद्धा त्या हजेरी लावणार असल्याचे समजते. २ डिसेंबर रोजी त्या पुन्हा कोलकत्त्याला रवाना होणार आहेत.
हेही वाचा - Anil Deshmukh : अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगासमोर हजर होणार
पक्षाच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या नेत्यांबरोबर भेटीगाठी -
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांचे काँग्रेससोबतचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. सध्या त्या पक्षाच्या विस्तारात व्यग्र आहेत. गेल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, मात्र या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतलेली नाही हे विशेष. सध्या आपण पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूपच व्यग्र असल्याने सोनिया गांधी यांची भेट घेतली नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या.ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वाही आहेत. त्यामुळे हा दौरा आणि या भेटीला महत्त्व आले आहे.
काँग्रेससोबत संबंध ताणले -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती मिळालेल्या विजयामुळे ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे सध्या त्या पश्चिम बंगाल बाहेरही त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याच्या विचारात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यातही त्यांनी पक्षविस्ताराचा प्रयत्न सुरु केला आहे. याशिवाय काँग्रेसमधील नाराज नेत्यांनाही त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश घ्यायला सुरु केला आहे. बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून त्यांचे काँग्रेस पक्षासोबत संबंध बिघडले असल्याची चर्चा आहे.