मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडला. आता शहरात पाऊस कमी झाला असला, तरी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसात धरणांतील पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे. ४ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा ५ लाख ५ हजार ८९६ इतका होता. आज (१६ ऑगस्ट) हा साठा १० लाख ९९ हजार ४४५ दशलक्ष लिटर (७५.९६ टक्के) इतका झाला आहे. या पाण्यामध्ये पुढील नऊ महिने मुंबईकरांची तहान भागेल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दर दिवशी ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणी उपसा करण्यात येतो. विहार तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली होती.
४ ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा ५ लाख ५ हजार ८९६ इतका होता. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरण्यासाठी सुमारे ४ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज आहे. सात धरणांपैकी २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत २० टक्के पाणी कपात केली असली तरी येत्या वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जमा होईल, असा विश्वास महानगरपालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मागील दोन वर्षांपेक्षा पाणीसाठा कमीच -
१६ ऑगस्टला सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत १० लाख ९९ हजार ४४५ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी या धरणांमध्ये १३ लाख ५६ हजार १२ इतका म्हणजेच ९३.६९ टक्के पाणीसाठा जमा होता. तर २०१८मध्ये आजच्याच दिवशी १२ लाख ९९ हजार ६५८ इतका (९८.७९ टक्के) पाणीसाठा जमा होता.
१६ ऑगस्टपर्यंतचा सातही धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर) -
- अप्पर वैतरणा - १ लाख ३५ हजार ७७
- मोडक सागर - १ लाख १६ हजार ८३१
- तानसा - १ लाख १४ हजार १३
- मध्य वैतरणा - १ लाख ५९ हजार ९१४
- भातसा - ५ लाख ३६ हजार ९६६
- विहार - २७ हजार ६९८
- तुळशी - ८ हजार ४६
एकूण - १० लाख ९९ हजार ४४५