मुंबई - मुंबईत दरदिवशी आग लागण्याच्या घटना घडतात आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. आग विझवण्यासाठी लागणारे पाणी वॉटर हायड्रेन्ट, वॉटर रिफिल सेंटर आणि महापालिकेच्या वॉटर यार्डमधून उपलब्ध करून दिले जाते. जवळपासच्या वॉटर रिफिल सेंटर आणि महापालिकेच्या वॉटर यार्डमधून पाणी उपलब्ध केले जात असल्याने वेळेवर पाणी उपलब्ध होऊन आग विझविणे सोपे होते. अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
वॉटर हायड्रेन्टची परिस्थिती बदलण्यास सुरुवात
मुंबईत आग लागल्यास ती विझविण्यासाठी पाणी त्वरित मिळावे यासाठी वॉटर हायड्रेन्ट उभारण्यात आले आहेत. मुंबईत एकूण 10 हजार 843 वॉटर हायड्रेन्ट आहेत. त्यापैकी 1 हजार 353 सुस्थितीत सुरू असून 9 हजार 290 वॉटर हायड्रेन्ट बंद होते. यामुळे आगी विझवताना मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण येत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत वेळोवेळी पालिका सभागृह, स्थायी समितीत आवाज उचलण्यात आला होता. त्याची दखल घेत मुंबई महापालिकाने अनेक ठिकाणचे वॉटर हायड्रेन्ट पुन्हा कार्यान्वीत करण्याचे काम सुरू केले आहे.
यार्ड, रिफिल सेंटरमधून पाणी
आग विझवण्यासाठी जागेवरच पाणी उपलब्ध करून देण्याचे काम वॉटर हायड्रेन्ट करतात. त्याचप्रमाणे आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. हे पाणी मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाच्या यार्डमधून उपलब्ध करून दिले जाते. अग्निशमन दलाच्या पाण्याच्या गाड्या यार्डमध्ये जाऊन पाणी भरतात. पाणी भरलेला टँकर घटनास्थळी पुन्हा येऊन आग विझवण्यासाठी वापरला जातो. मुंबईत अग्निशमन दलाने २६ टँकर फिलिंग पॉईंट लावण्यात आले आहेत. मात्र ते पुरेसे नसल्याने त्यात वाढ करण्याचे पालिकेचे उद्दीष्ट आहे.
हेही वाचा-मागील पाच दिवसात पुण्यात आगीच्या सात घटना, कोट्यवधींचे नुकसान