मुंबई - आज सकाळी ७ वाजेपासून राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. प्रत्येक बुथवर मतदारांनी मतदानाला सुरूवात केली आहे. २८८ जागांसाठी हे मतदान पार पडत आहे.
राज्यातील ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार आपले मत नोंदवणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात ९५,४७३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदानासाठी १.८ लाख ईव्हिएमचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक बुथवर निवडणूक आयोगकाडून मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पक्षांच्या स्वयंसेवकही प्रत्येक बुथच्या बाहेर मतदारांना त्यांचे नाव आणि मतदार यादीतील क्रमांक शोधून देण्यास मदत करत आहे.
हेही वाचा- ईव्हीएम मशीनवर मतदान होते तरी कसे?
मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, व्हिलचेअर, रुग्णवाहिका, प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, अंधदृष्टी असणाऱ्या मतदारांसाठी भिंग, पूर्ण अंधत्व असलेल्यांसाठी ब्रेल लिपी आणि डमी मतपत्रिका, मदत केंद्रे, ऊन्हाच्या ठिकाणी मंडप तसेच लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदारसंघात केवळ महिलांसाठी काही 'सखी' मतदान केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी फक्त महिला कर्मचाऱ्यांवर आहे.