मुंबई : मणिपूरमध्ये अतिशय विदारक परिस्थिती असून हिंसाचार उसळला आहे पण असे असताना मणिपूरमधील हिंसाचार थांबवून नागरिकांना सुरक्षितता देणारा प्राधान्य देण्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटकच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या दोन नेत्यांना देश महत्त्वाचा वाटतो की सत्ता हे स्पष्ट होते.
एकीकडे चीन चारही बाजूंनी भारताला घेण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असताना देखाल त्याबाबत चकार शब्द न उच्चारता केवळ सत्तेच्या आणि निवडणुकीतील प्रचाराच्या मागे केंद्रातील दोन महत्त्वाचे मंत्री धावत आहेत, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
जनतेशी देणे घेणे नाही : भारतीय जनता पक्षाला आणि केंद्र सरकारला जनतेशी कोणतेही देणे घेणे असल्याचे दिसत नाही. एक ऐतिहासिक दाखला नेहमी दिला जातो. रोम जळत होते आणि निरो फिडल वाजवत होता. त्याचप्रमाणे आता मणिपूर जळत असताना पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्रचाराच्या राजकारणात गुंतले आहेत अशी जहरी टीका लोंढे यांनी केली आहे.
आठ जिल्ह्यांमध्ये दंगलीचा वणवा : आदिवासींच्या आंदोलनादरम्यान बुधवारी हिंसाचार उसळला होता. जवळपास आठ जिल्ह्यांमध्ये दंगलीचा वणवा पेटला आहे. दंगलखोरांना गोळ्या घालण्याच्या आदेशाला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परिस्थिती गंभीर बनल्यानंतर प्रशासनाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ जारी केला. ते म्हणाले की, राज्यातील हिंसाचार हा गैरसमजातून जन्माला आला आहे. आता तोडफोड, हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
9 हजाराहून अधिक नागरिक : सुरक्षित स्थळी मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी, बहुसंख्य गैर-आदिवासी मीतेई समुदायामध्ये तणावाचे वातावरण आहे. बुधवारी (३ मे) रात्री तणावाला हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्सच्या अनेक तुकड्या तातडीने रात्रभर तैनात करण्यात आल्या. हिंसाचारामुळे 9 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.