मुंबई - राज्यात सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरातील सरस्वती विद्यालयातील मतदान केंद्रांमध्ये एक महिला सखी केंद्र उभारण्यात आले आहे. महिलांना जास्तीत जास्त मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना कोकम, गुलाब पुष्प व गोड पदार्थ देऊन स्वागत करण्यात येत आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क? -
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
मतदान केंद्र -
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.