मुंबई - मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून पुरेशा लसीचा साठा मिळत नसल्याने दर 8 ते 10 दिवसांनी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. ऑगस्ट महिन्यात १२ व १३ ऑगस्टला लसीकरण बंद होते. आता पुन्हा पालिका आणि सरकारी केंद्रांवर १९ व २० ऑगस्टरोजी लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पुन्हा लसीचा तुटवडा -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. मुंबईत लोकसंख्या जास्त असल्याने दिवसाला ५० ते ६० हजार, तर कधी कधी सवा ते दीड लाखांपर्यंत लसीकरण झाले आहे. लसीकरणाला प्रचंड गर्दी होत असल्याने लसीचा तुटवडा भासत आहे. लसीचा साठा मिळाल्यावर काही दिवस लसीकरण सुरु राहते. मात्र, पुन्हा लसीचा तुटवडा जाणवू लागल्यावर लसीकरण बंद ठेवावे लागते, अशी परिस्थिती मुंबईत सतत निर्माण होत आहे.
गेल्या 10 दिवसात दुसऱ्यांदा लसीकरण बंद -
मुंबईत १२ व १३ ऑगस्टला लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता १९ व २० ऑगस्टला लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. १९ ऑगस्टला लसीचा साठा आल्यावर २० ऑगस्टला केंद्रांवर लस वितरित केली जाणार आहे. यामुळे २० ऑगस्टलाही लसीकरण बंद ठेवले जाणार आहे. २१ ऑगस्टला लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
८२ लाख लाभार्थ्यांना लस -
मुंबईत १६ जानेवारीपासून १८ ऑगस्टपर्यंत ८२ लाख ४३ हजार ७८९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात ६१ लाख ५९ हजार ८९६ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर २० लाख ८३ हजार ८९३ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूण ८२ लाख ४३ हजार ७८९ डोस पैकी कोव्हिशिल्ड लसीचे ७६ लाख १४ हजार ४८५, कोवॅक्सिन लसीचे ६ लाख ४ हजार ४७४ तर स्पुतनिक व्ही लसीचे २४ हजार ८३० डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा - Corona Update : रुग्ण, मृत्यूसंख्या वाढली, ५१२३ नवे रुग्ण तर १५८ जणांचा मृत्यू