मुंबई - लसीकरण मोहीम सुरू असून सतत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहेत. तसेच कमी लसीकरण केंद्रांवर लस द्यावी लागत आहे. गुरूवारीही लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. आज (शुक्रवार) लसीचा तुटवडा असल्याने पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- लस उपलब्ध झाल्यावर पुन्हा लसीकरण सुरू -
मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना विरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत रोज ६० ते ७० हजार लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत चार वेळा एक ते दीड लाखापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत ५८ लाख ८४ हजार १९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. रोज होणाऱ्या लसीकरणाच्या आकडेवारीचा विचार केल्यास लसीचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. गुरुवारीही काही लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लसीचा साठा संपल्याने आज लसीकरण बंद ठेवले जाणार आहे. लसींचा साठा आल्यावर पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- लसीकरण मोहीम -
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करांना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली गेली. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले. तरीही सध्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 ते 44 वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.
मुंबईतील 7 जुलैपर्यंतचे लसीकरण -
- आरोग्य कर्मचारी - 3 लाख 18 हजार 186
- फ्रंटलाईन वर्कर - 3 लाख 77 हजार 320
- ज्येष्ठ नागरिक - 14 लाख 66 हजार 992
- 45 ते 59 वय - 17 लाख 23 हजार 457
- 18 ते 44 वय - 19 लाख 85 हजार 678
- स्तनदा माता - 3 हजार 466
- परदेशी शिक्षण विद्यार्थी - 8 हजार 646
- मानसिक रुग्ण - 274
- एकूण - 58 लाख 84 हजार 019
हेही वाचा - मुंबई : मनपाकडून 'या'ठिकाणी मिळणार लसीकरणाची अचूक माहिती