मुंबई - 4 आणि 5 ऑक्टोबरला होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रेल्वेने प्रवास करता येणार असल्याचे रेल्वेकडून सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दिवशी स्थानकावर प्रवेश करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी परीक्षा पत्र (अॅडमिट कार्ड) दाखवावे लागणार आहे. स्थानकावरचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना विद्यार्थ्यांना प्रवासाला परवानगी देण्यात यावी, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर जास्तीचे तिकीट काऊंटर उघडण्यात येणार आहेत. तसेच जादा रेल्वेदेखील सोडण्यात येणार आहेत. इतर कोणीही प्रवासासाठी स्थानकावर गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेकडून केले आहे. तसेच प्रवास करताना वैद्यकीय आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळावे लागणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गरजेची सगळी माहिती रेल्वेकडून देण्यात येईल, असेही रेल्वेकडून सांगितले आहे.
हेही वाचा - खूशखबर! जीएसटी वार्षिक रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत वाढवली; जाणून घ्या परिणाम...