पेण(रायगड) : महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी गती देणारा मुंबई-गोवा महामार्ग या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. गडकरी पनवेल येथील खारपाडा टोल प्लाझाजवळील खारपाडा गावात बोलत होते. त्यामुळे ही कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे.
महामार्गाचे भूमीपूजन : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 मुंबई ते गोवा महामार्ग पनवेल ते कासू महामार्गाची लांबी 42.300 किमी आहे. तसेच या महामार्गाला 251.96 कोटी खर्च येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 DD राजेवाडी फाटा ते वरंधा गाव या रसत्याची लांबी 13 किमी असुन खर्च 126.73 कोटी असणार आहे. दोन- राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 DD भूमिपूजन सपाटीकरण कार्यक्रम याद्वारे वरंध गाव ते पुणे जिल्ह्याच्या सीमेपर्यंत तीन प्रकल्पांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लांबी 8.60 किमी असुन खर्च 35.99 कोटी असणार आहे. एकूण महामार्गाची लांबी 63.900 किमी असणार आहे. यासाठी एकूण 414.68 कोटी खर्च येणार आहे.
मोरबे-करंजाडे रसत्याची घोषणा : भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदार अशा समस्यांमुळे कोकणातील अनेक कामगारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी 13 हजार कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या कामाची घोषणा केली. हा मार्ग जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल. ज्यामुळे मुंबई ते दिल्ली प्रवासाचा वेळ कमी होईल. 1200 कोटी रुपयांचे कळंबोली जंक्शन तसेच 1146 कोटी रुपयांचे पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवसायाला चालना मिळेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यामुळे कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग कोकण, महाराष्ट्रातील 66 पर्यटन स्थळांना जोडणार असुन पर्यटन विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्याने कोकणातील फळे, इतर उत्पादनांची जलद वाहतूकही सुलभ होणार आहे, असे गडकरी म्हणाले.
सर्वतोपरी सहकार्य करणार : महाराष्ट्र राज्याने कोकणच्या जलशक्तीचा उपयोग करून पर्यटन, दळणवळणाच्या उद्देशाने लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट, वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला पाहिजे. हे पर्याय लवकरात लवकर अमलात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, त्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासन गडकरींनी यावेळी दिले.