मुंबई - गोरेगाव पश्चिम येथील उद्योग नगर इंडस्ट्रीयल इस्टेटला शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये धुरामुळे अग्निशमन दलाचे ३ अधिकाऱ्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गोरेगाव पश्चिम येथे काम क्लब जवळ उद्योग नगर इंडस्ट्रियल इस्टेट आहे. या इमारतीमध्ये तळ मजला आणि आणखी दोन मजले आहेत. या इंडस्ट्रियल इस्टेटमधील दोन बंद असलेल्या गोडाऊनला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. 'सेलसन' हे प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याने त्यामधील रसायनाने पेट घेतला. अग्निशमन दलाला माहिती मिळताच ८ फायर इंजिन आणि सात वॉटर टँकरसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विझवताना रसायनाच्या धुरामुळे व्ही. बी. दारीपकर, मनोहर चव्हाण, पी. आर. परुळेकर हे तीन अग्निशमन दलाचे अधिकारी अस्वस्थ झाले. त्यांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग लागली त्यावेळी गोडाऊन बंद असल्याने जीवितहानी झालेली नाही. मात्र, गोडाऊन जळून खाक झाल्याने वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.