मुंबई- राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेनेच्या मागणीला भाजप जुमानत नसल्याने त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. मात्र, यादरम्यान सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने हालचाल करायला सुरूवात केली आहे. आज राजकीय घडामोडी गतिमान झाल्या असून सकाळपासून सर्वच पक्षांच्या अनेक बैठका पार पडल्या. दुपारच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात वांद्र्यातील हॉटेल ताज लँड येथे बैठक पार पडली.
पवार व ठाकरेंमध्ये जवळपास २० मिनिटे सध्याच्या परिस्थितीवर व सर्व पर्यायांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. राजकीयदृष्ट्या ही बैठक खूप महत्वाची मानली जात आहे. या बैठकीला आदित्य ठाकरे, संजय राऊत, अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आदि नेते उपस्थित होते. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे समजते.
मात्र, बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी जरी सामंजस्य असले तरी शिवसेनेला समर्थन देण्याबाबत काँग्रेस पक्षाची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचेही काँग्रेसविना सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. याबाबत आज काँग्रसची सी.डब्ल्यू.सी ची बैठक झाली. मात्र, त्यात शिवसेनेशी हातमिळवणीबाबत ठोस निर्णय झाला नाही. आज ४ वाजता पुन्हा काँग्रेसकडून बैठक बोलविण्यात आली आहे. भाजपकडून देखील आज ५ वाजता बैठक घेण्यात येणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसची काय भूमिका आहे, याकडे आता शरद पवारांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर, काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊ शकते, अशी बातमी सुत्रांकडून समजते.