मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी 'पुष्पहार घेऊन मातोश्रीवर येऊ नका,त्याबदल्यात सामाजिक कार्य करा' असे आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून 27 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.
मातोश्रीवर येऊ नका: ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते यादिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येत असतात. शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीवर गर्दी करतात.ही गर्दी इतकी असते की बहुतेकवेळा कलानगर परिसरात कार्यकर्त्यांची रांग लागत असते. मात्र यावर्षी इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी जीवितहानी झाल्याने उद्धव ठाकरेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत."माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी कोणीही मातोश्रीवर येऊ नये",असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहेत.
इर्शाळवाडीला भेट: शनिवारी उद्धव ठाकरेंनी रायगडमधील इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच जोपर्यंत सर्वबाधित कुटुंबांचे योग्य पुनर्वसन होत नाही. तसेच या प्रश्नांवर योग्य तोडगा निघत नाही. तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासनदेखील उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांना दिले. रायगडमधील दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा आवाहन कार्यकर्त्यांना केले.
उपमुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल: दरम्यान शनिवारी 22 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचादेखील वाढदिवस होता.अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी 'अजित उत्सव' या विशेष कार्यक्रमाचा आयोजन केले होते. मात्र रायगडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी आपल्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले.आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-