मुंबई: शिवसेनेतील बंडखोरीनंतर 12 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या मतदार संघातील जागा पुन्हा निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे आज आढावा घेणार आहेत. दरम्यान, मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी दुपारी बारानंतर बैठकींचा सिलसिला सुरु राहणार आहे.
बैठकांचे सत्र: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे नव्याने उभारी देण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. 12 खासदारांचा पराभव करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार आज दिवसभरात उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठका होणार आहेत. एक दुपारी 12 वाजता, दुसरी दुपारी 1 वाजता आणि तिसरी दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिमचा आढावा घेतला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पूर्व तसेच तिसऱ्या टप्प्यात मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिणचा आढावा घेतला जाणार आहे.
मतदार संघावर फोकस: मतदारसंघातील परिस्थिती, वातावरण आणि सुरू असलेल्या कामांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मतदारसंघातील वातावरण अधिक पोषक करण्याचे नियोज आखण्यात येणार आहे. शिवसेनेचे उपनेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा समन्वयक, विधानसभा संघटक, शाखाप्रमुख, महिला विभाग संघटक, युवासेना विभाग अधिकारी, माजी खासदार, माजी आमदार, विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आणि नगरसेवकांना देखील बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.